पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील घटना
पारोळा प्रतिनिधी तालुक्यातील टिटवी तांडा येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे युवराज नारायण पवार (वय ५५) असे नाव आहे. शेतकरी युवराज पवार यांनी टिटवी तांडा शेत शिवारातील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत दीपक पवार यांनी पारोळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
युवराज पवार हे शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, सततच्या नापिकी व अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्न आले नाही. अशा नैराश्येच्या विवंचनेत अखेर कर्जाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.









