जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी दिव्यांग मंडळाच्या कामकाजावेळी काही नागरिकांनी हुज्जत घातल्यामुळे आणि राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे मानसोपचार विभागातील डॉ. दिलीप महाजन यांनी दिव्यांग मंडळाचा राजीनामा अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात गैरकाम करण्यासाठी अनेक डॉक्टरांवर कार्यकर्त्यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच उद्रेक होऊन डॉ. महाजन यांनी गैरकाम करण्यास नकार देत राजीनामा दिल्याची माहीती मिळत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग मंडळात वैद्यकीय तपासणीचे कार्य चालते. या मंडळात मानसिक दिव्यांग असणाऱ्या मुलांना व नागरिकांना तपासण्यासाठी रुग्णालयातील मानसोपचार विभागातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी दिव्यांग मंडळात मानसिक दिव्यांग नागरिकांची डॉ. महाजन तपासणी करीत असताना काही नागरिकांनी नियमात बसत नसतानाही, त्यांना काम करून देण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियमात बसत नाही म्हणून डॉ. महाजन यांनी गैरकाम करण्यास नकार दिला.
या नागरिकांनी हुज्जत घातल्याने कक्षाजवळ काहीशी गर्दी झाली होती. रुग्णालयाचे प्रमुख असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांनी मात्र या घटनेची दखल देखील घेतलेली नाही. डॉ. दिलीप महाजन यांनी नकार दिल्याने संबंधित नागरिक अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांच्याकडे गेले होते, मात्र त्यांनी या नागरिकांना दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्याकडे न पाठवता डॉ. महाजन यांनाच जाब विचारल्याचे माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वीही असे प्रकार घडल्यामुळे डॉ. दिलीप महाजन यांनी दिव्यांग मंडळाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. मानसोपचार विभाग पूर्वी औषधशास्त्र विभागात होता, तो दोन महिन्यापासून शल्यचिकित्सा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. नियमात बसत नसतानाही नागरिक जर हुज्जत घालतील तर रुग्णालयात काम करणे कठीण होईल अशी प्रतिक्रिया अनेक डॉक्टरांकडून मिळत आहे. रुग्णालयात काम करीत असताना डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या महिन्याभरापासून हे चित्र दिसून येत आहे. मानसोपचार विभागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. दिलीप महाजन यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील डॉ. पूर्वा मणेरीकर, डॉ. कांचन नारखेडे आहे. येथील जागा रिक्त असल्याने या विभागात मनुष्यबळाचा प्रश्नदेखील कायम आहे.