नांदेड ( वृत्तसंस्था ) – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा केला. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला.

नितीन गडकरी यांच्याकडून देखील विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. वडेट्टीवारांनी खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला नितीन गडकरींनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण विजय वडेट्टीवार यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही, असं गडकरींच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय.प्रचारसभेत वडेट्टीवार यांनी केलेलं हे वक्तव्य सभा जिंकण्यासाठी होत की खरच अस काही आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली होती.
देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.







