जळगाव ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील गांधली येथे दहा दरोडेखोरांनी शेतातील शेडमधून तब्बल ६३ बकऱ्या लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील जळोद रस्त्यावरील गट नंबर २०६ मध्ये जालंदरनाथ चौधरी (रा. गांधली, ) यांच्या मालकीचे बकऱ्यांचे शेड आहे. या शेडच्या रखवालीसाठी सोमा मोरे यांना ठेवण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री दहा जणांची टोळी तोंडाला रुमाल बांधून आली, त्यांनी सोमा मोरे आणि त्यांच्या पत्नीला पावरी भाषेत दमदाटी करून त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून घेत सिम कार्ड काढून घेतले. नंतर त्यांना ‘तुम्ही खोलीतच थांबा, आरडाओरडा केल्यास तुम्हाला मारून टाकू’, अशी धमकी देऊन खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. बकऱ्यांच्या शेडचे गेट तोडून २ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ बकऱ्या चोरून नेल्या.
सोमा मोरे यांनी दरवाजा वाकवून मुलाला बाहेर काढले. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. पहाटे ५ वाजता सोमा मोरे यांनी दुसऱ्याच्या मोबाइलवरून मालक चाैधरी यांना फोन करून माहिती दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, हे कॉ किशोर पाटील, अमोल पाटील, पो ना शरद पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. जालंदरनाथ चाैधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उनि शत्रुघ्न पाटील करीत आहेत.
बकऱ्याचे शेड मुख्य रस्त्यापासून एक किलाेमीटर आत पूर्वेला आहे. तेथे चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे चोरट्यांनी चारचाकी जळोद रस्त्यावर उभी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.