जिल्हाधिकारी यांचे आदेश
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद भारंबे यांनी नियमाचा भंग केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. त्याबाबत योग्य ते पुरावे सादर न करू शकल्याने प्रल्हाद भारंबे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र करण्याबाबत आदेश दिले आहेत.
तालुक्यातील मौजे गाडेगाव ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद बळीराम भारंबे यांनी ग्रामपंचायत कराचा भरणा मुदतीत केला नसल्याची तक्रार विजय जनार्दन चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून प्रल्हाद भारंबे यांनी मुदतीत ग्रामपंचायत कर भरणा केला नसल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ (ह) अन्वये ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवले आहे. तक्रारदार विजय चौधरी यांचे तर्फे ॲड. वसंत भोलाणकर, जळगाव यांनी कामकाज पाहिले.