भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन
अशोक जैन, अनिल जैन यांच्या हस्ते महाआरती; शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) – ‘गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य, गड किल्ल्यांतून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला’ या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक ३९ दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना पाहता येत आहे.
काव्यरत्नावली चौकात भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशउत्सवात मंडळातर्फे बाप्पाची महाआरती आयोजीत करण्यात आली होती. त्याचा मान जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सौ.निशा जैन यांना मिळाला. त्यांच्या हस्ते आज आरती झाली.
याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, स्वरूप लुकंड, सपन झुनझुनवाला, राजेश नाईक, अनिल जोशी, दिलीप पाटील, लेफ्टनंट कर्नल शिवराज पाटील, लेफ्टनंट कर्नल गौतम भालेराव, प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, संजीव पाटील, जितोच्या निता जैन, शिल्पा चोरडीया, प्रिती चोरडीया, निलेश चौधरी, विराज कावडीया, पियूष हसवाल, प्रितम शिंदे, तेजस श्रीश्रीमाळ, राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शौर्यवीर ढोल-ताशा पथकातील १०० वादकांतर्फे आकर्षक प्रस्तूती सादर करण्यात आली. ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लाडक्या बाप्पाच्या महाआरती साठी जळगावकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे अधिष्ठान महाराष्ट्राच्या अस्मितेला लाभलेले आहे. भक्तीची आठवण देणारी मंदीरे आणि शक्तीचे प्रतीक गड-किल्ले स्वराज्यात उभारले आणि संवर्धित केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच अस्मितेला प्रज्वलीत केले. आणि महाराष्ट्राची कणखर देशा म्हणून ओळख झाली. स्वराज्याचा मूलाधार असलेली डोंगरी आणि सागरी दुर्ग, गड-किल्ले छत्रपतींचा प्रगल्भ राजनीतीची आणि मर्द मावळ्यांच्या अजोड पराक्रमाची गाथा गात आजही उभे आहेत. यातील काही निवडक दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना बघता येत आहेत.
या किल्ल्यांचे पाहता येईल विहंगम दृश्य
रायगड, विश्रामगड, अंजिक्य तारा, प्रतापगड, भुदरगड, अलंग-मदन-कुलंग, रोहिडा, धोडप, गोपाळगड, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, पुरंदर, साल्हेर, विशालगड, लोहगड,लिंगाणा, कोरीगड, राजमाची, माहुली, मल्हारगड, मांगी-तुंगी, वसई, परांडा, नळदुर्ग, मुरूड-जंजिरा, पद्मदुर्ग, कोर्लई, खांदेरी, उंदेरी, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग, पूर्णगड, जयगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग,अर्नाळा, कुलाबा किल्ला यांचे विहंगम दृश्य पाहता येईल. जळगावकरांना दुर्गसंस्कृती माहिती व्हावी, त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून ते बघावे समजून घ्यावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशतर्फे विराज कावडिया यांनी केले आहे.