जळगाव ( प्रतिनिधी ) – सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत ग. स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला गती आली आहे. संस्थेकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मतदार याद्या सादर करण्यात आल्या त्या दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. हरकती मागवून त्यावर निर्णय देण्यासह निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्चअखेर निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मतदारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई मतदार यादी प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवसांत हरकती मागवल्या जातील. यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीचा ३० दिवसांचा तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदान होईपर्यंत ४० दिवसांचा असा दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.