जळगाव (प्रतिनिधी )- तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने अप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १३ हजार ९५८ रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
रोहित राजाराम पाटील (वय-२९) रा. शिरसोली ता. जि. जळगाव हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरीला आहे. रोहीत पाटील हे २८ जानेवारी रोजी शिरसोली येथे घरी असतांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना एक मॅसेज आला. मॅसेजनुसार त्यांना एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि त्यात डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड आणि पासबुकचे फोटो अपडेट केले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीवाचून बँक खात्यातून १३ हजार ९५८ रोकड परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.