जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर ५० टक्के नफ्याचे आमिष दाखवून जळगाव येथील एका ६१ वर्षीय निवृत्त व्यक्तीला तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कमलाकर धोंडू चौधरी (वय ६१, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. ३१ ऑगस्ट २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. फिर्यादीला ‘Astha Trade 833 Education Community’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यांना ‘ACSTRADE’ नावाचे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. भरलेल्या रकमेवर ५० टक्के नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
जेव्हा फिर्यादीने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रक्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे टॅक्स भरण्याच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांवर एकूण १,३५,८५,१८९ रुपये भरून घेतले. मात्र, कोणतीही रक्कम परत न करता त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीनुसार, कुणाल कुमार, नेहा बन्सल, आरव गुप्ता या व्यक्तींनी आणि मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.
००००००००००००००००









