भुसावळला निवृत्त शिक्षकाचे ८ लाख लंपास
जळगाव प्रतिनिधी – तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी सर्वसामान्यांना लुटत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका ७९ वर्षीय निवृत्त शिक्षकाला आजारपणाच्या ग्लानीत एका लिंकवर क्लिक करणे महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ८९ हजार ९९२ रुपये लंपास केले आहेत.

भुसावळच्या आदर्श हायस्कूलचे निवृत्त शिक्षक माधवदास खिल्लूमल शुगानी हे ५ सप्टेंबर रोजी आजारी होते. औषधांची यादी डाऊनलोड करण्यासाठी ते प्रयत्न करत असताना, चुकून एका अज्ञात लिंकवर त्यांचा स्पर्श झाला. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी ती लिंक डिलीट केली आणि ते झोपी गेले. त्यानंतर सतत १२ दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपला मोबाईल तपासला नाही.
१५ सप्टेंबर रोजी जेव्हा शुगानी यांनी त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातील शिल्लक तपासली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. खात्यातील अंदाजे रक्कम ७ लाख ८९ हजार ९९२ रुपये गायब झालेले होती. विशेष म्हणजे, ही रक्कम काढली जात असताना त्यांना कोणताही ओटीपी आला नाही किंवा त्यांनी कोणालाही कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती. चोरट्यांनी दहा दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे पैसे काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुगानी यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.









