मुंबई ( प्रतिनिधी ) – एटीएममध्ये आलेल्याचे पिन क्रमांक चोरून पाहून त्यांना बोलण्यात गुंगवून डाटा चोरी करून पैसे काढून गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 414 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला आहे. आरोपींना ठाणे न्यायालयाने २७ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी वंदना विजय गोरी 10 जुलै 2019 रोजी बँक ऑफ बडोदा दहिसर एटीएममध्ये दहा हजार रुपयांची रक्कम काढण्याकरता गेल्या होत्या. त्याचवेळी एटीएममध्ये तीन अज्ञात इसमांनी शिरकाव केला. वृद्ध वंदना गोरी यांचा नातू नीरज याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडे असलेले एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत एटीएम कार्डचा डेटा चोरी केला. तब्बल 73 हजार २०० रुपये बनावट एटीएम कार्डद्वारे काढून या वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली. अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना आरोपी शोधून जेरबंद करणे म्हणजे आव्हानच होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि प्रदीप सरफरे आणि त्यांचे तपास पथक यांनी तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारावर तीन आरोपीना बेडया ठोकल्या. आरोपी जमिल अहमद मोहम्मद दरगाही शेख, गोविंद हनुमंत सिंग,आशिष कुमार उदयराज सिंग या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची कसून चौकशी केली. चोरलेला डेटा दुसऱ्या कार्डवर पेस्ट करत एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करीत असल्याचं समोर आले. दरम्यान या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत जवळपास 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून या त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.