अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याची बतावणी करून ८६ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला ८० लाखांचा गंडा!

भुसावळ तालुक्यातील घटना
जळगाव प्रतिनिधी : भुसावळ येथील महावितरणमधील ८६ वर्षीय निवृत्त अधिकारी यांना सायबर भामट्याने मनी लॉण्ड्रींग, आंतकी कारवाईसाठी तुमचे बँक खात्यांचा वापर झाल्याची भीती घालून ८० लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ येथील महावितरण कंपनीतून निवृत्त अधिकारी सुखदेव चौधरी (वय ८६) यांच्या मोबाईलवर २७ ऑक्टोबर रोजी एक अनोळखी फोन आला. त्यावर भामट्याने आम्ही डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर थोड्या वेळाने याच व्यक्तीने तुमचा फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जोडून देण्याचे सांगितले. यानंतर संबंधित भामट्याने चौधरी यांना व्हिडिओ कॉल करून मी मुंबई कुलाबा पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी विजय त्रिपाठी बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तक्रारीत तुमच्या मोबाईल नंबरद्वारे अनेक लोकांची फसवणूक करण्यात येत आहे असे सांगितले.
यानंतर संजय पिसे म्हणून आणखी एका भामट्याने चौधरी यांना संपर्क करत तुमच्या विरुद्ध अंधेरी ईस्ट येथे कॅनरा बँकेत खाते उघडून त्या खात्याचा वापर आतंकवादी संघटनांनी केलेला आहे असे दस्तऐवज व्हॉटस् अॅपवर टाकला.
संबधितांनी सुखदेव चौधरी यांना घमकावत घडला प्रकार कुणालाही सांगायचा नाही, कुटुंबात कुणाला सांगू नका असे म्हणत त्यांच्याकडून न केलेल्या गुन्ह्याचा लेखी कबुलनामा लिहून घेतला. ते पत्र पाठवल्यावर तेथून मुंबई पोलिस हेडक्वार्टर असा शिक्का मारुन ते त्यांना परत व्हॉटस्अॅपद्वारे पाठवण्यात आले. तसेच, अब्दुल सलाम नावाच्या संशयित याने तुमच्या बँक खात्यात रक्कम टाकलेली आहे. तुमच्या जिवाला त्याच्या पासून धोका आहे, म्हणून दर दोन तासांनी तुम्ही बोथ आर सेफ जयहिंद लिहिलेला मॅसेज आम्हाला पाठवा. असेही सांगितले.
पहिले मनिलॉण्ड्रींग मध्ये तुमचे खाते वापरले आहे. त्यानंतर आतंकी कारवाईत तुमचा बँक खात्यामध्ये पैसे आले असल्याचे सांगत दहशतवादीसोबतच्या फोटोमध्ये चौधरी यांचा फोटो चिकटून टाकण्यात आला. त्यानंतर संशयित यांनी तुमच्या खात्यात किती रक्कम असल्याचे विचारले. त्यावर चौधरी यांनी ८० लाख असल्याचे सांगून टाकले. त्यावर ही सर्व रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यात तुम्हाला टाकून द्यावी लागेल तेथून या रकमेची पडताळणी करुन तुम्हाला परत दिली जाईल असे म्हणत तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे टाकण्यास भाग पाडले.
त्यानंतर संबधित सायबर गुन्हेगारांनी चौधरी यांना भारतीय रिझर्व बँकेचा सही शिक्का असलेले पत्र पाठवले. पैसे दिल्यानंतर त्यांचे फोनही बंद झाले पैसेही परत मिळाले नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच सुखदेव चौधरी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरुन संशीतांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








