नाशिकच्या दोघांविरुद्ध चोपड्यात गुन्हा दाखल
चोपडा ( प्रतिनिधी ) – नाशिक येथील अपार्टमेंट मधील फ्लॅट विक्री करण्याचे आमिष दाखवून ७ लाख २८ हजार रुपयांचा धनादेश व रोख असा अडव्हॉन्स घेऊन नाशिक येथील ओळखीच्या दोघांनी प्लॉटची सौदा पावती करून न देता टाळाटाळ करून खरेदीदाराला दमदाटी व शिवीगाळ करून धमकी देऊन चोपडा शहरातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी नाशिक येथील दोघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बोरोले नगर मधील चंद्रशेखर साहेबराव मत्तलवार (वय-४०) यांना नाशिक येथे अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांनी ओळखीच्या किरण भास्कर कानडे (रा.नांदुरी ता.कळवण जि. नाशिक), भंवरलाल मांगीलाल चौधरी (रा. पंचवटी नाशिक) यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फ्लॅट घेणे बाबत चर्चा केली. त्यानंतर दि.५ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता किरण भास्कर कानडे व भंवरलाल मांगीलाल चौधरी या दोघांनी चोपड्यात येऊन बोरोले नगर मधील चंद्रशेखर साहेबराव मत्तलवार यांचे घर गाठले.
यावेळी त्यांनी नाशिक येथील दिंडोरी रोड वरील जय जिनेंद्र अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ३०४ याचे कागदपत्र दाखवून दोघांनी संगनमत करून चंद्रशेखर मत्तलवार व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून फ्लॅटचा सौदा केला. यावेळी सौद्यापोटी चंद्रशेखर मत्तलवार यांनी स्वतःच्या बँक खात्याचा धनादेश व सिडीएमआय मशीनद्वारे रोकड असे एकूण ७,२८,००० रुपये रोख अडव्हॉस म्हणून किरण भास्कर कानडे रा. नांदुरी (जि. नाशिक), भंवरलाल मांगीलाल चौधरी रा. पंचवटी नाशिक यांना दिले. त्यानंतर फ्लॅटची सौदा पावती करणेसाठी चंद्रशेखर मत्तलवार यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक येण्यास सांगितले.
ठरल्या प्रमाणे सौदापावती करण्यासाठी चंद्रशेखर मत्तलवार साक्षीदार समीर क्षीरसागर, गणेश काशिनाथ पाटील असे तिघे जण नाशिक येथे सकाळी ११ वाजता पोहचून कला नगर, पंचवटी नाशिक येथे भंवरलाल मांगिलाल चौधरी यांचे ऑफीसला गेले. त्यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत थांबण्यास सांगून ते निघून गेले. किरण भास्कर कानडे व भंवरलाल मांगीलाल चौधरी हे सायकांळ पर्यंत ऑफीसला न आल्याने चंद्रशेखर मत्तलवार यांनी भ्रमणध्वनीवरून दोघांशी संपर्क केला परंतु दोघांचे मोबाईल बंद होते.
दुसऱ्या दिवशी किरण कानडे याचे राहत्या घरी जाऊन सौदा पावतीचे काय अशी विचारणा केली असता त्याने सांगितले की, तुम्ही आता घरी जा. मी तुम्हांला २/३ दिवसात सौदा पावती बाबत कळवितो. त्यानंतर भंवरलाल चौधरी यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो म्हणाला की, फ्लॅट तुम्हांला मिळणार नाही आणि पैसे देखील परत मिळणार नाही तसेच किरण कानडे याने देखील भ्रमणध्वनीवर बोलतांना कोणता फ्लॅट कोणते पैसे असे बोलून चंद्रशेखर मत्तलवार यांना दमदाटी व शिवीगाळ करुन तुझ्या कडून काय होईल ते करून घे अशी धमकी देऊन ७,२८,००० लाखात फसवणूक केली.
या प्रकरणी चंद्रशेखर साहेबराव मत्तलवार (वय ४०) रा. बोरोले नगर चोपडा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला किरण भास्कर कानडे रा. नांदुरी (जि. नाशिक), भंवरलाल मांगीलाल चौधरी रा. पंचवटी नाशिक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. किरण शिंपी करीत आहेत.









