किरण माळी
साकळी ता.यावल ;- कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना हा आजार आपल्या भारतात डोके वर काढत असून आपल्या भारत देशात सुरू असलेल्या लोकडाऊन चे काटेकोर पणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी लोक अजून ही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रिकामे फिरत आहेत. भारतात कोरोना संसर्गाची आकडेवारी चिंताजनक वाटते. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून घरातच थांबावे असे आवाहन साकळी ता. यावल येथील माजी सरपंच कै. आप्पासाहेब मधुकर महाजन यांचा मुलगा शशांक महाजन याने कुवैत येथून जळगाव जिल्हावासीयांना केले आहे.
शशांक महाजन हा पेट्रोलियम इंजिनिअर असून कुवेत येथील “कुवैत ड्रिल्लींग कंपनी” मध्ये नोकरीला आहे. संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना ने कुवेत येथे शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील शासन, प्रशासन आणि जनतेने एकजुट दाखवत कोरोनावर मात करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. तेथिल प्रशासनाकडून ११ मार्च ते २८ मे पर्यंत लोकडाऊन करण्यात आला आहे. कोणतीही गाडी रस्त्यावर दिसल्यास दंड आहे तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेतच उघडी ठेवण्याची परवानगी आहे. आजपर्यंत तेथे ३७४० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद असून २४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर त्याठिकाणी १३८९ लोक कोरोनावर मात करून बरे झाले आहे.
शशांक महाजन आजही विदेशातून आपल्या आई, भाऊ, बहीण, नातेवाईक व मित्रांना फोन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विनंती करीत आहेत की, कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगात थैमान घातले आहे. त्याच्या वर मात करायची असेल तर सर्वांनीच लोकडाऊनचे नियम पाळले पाहिजे. संपुर्ण जग ही लढाई लढत आहे. मात्र हि लढाई माझी किंवा तुझी न करता प्रत्येकाने या लढाईत भाग घेऊन कोरोना ला हरवायच आहे. विनाकारण बाहेर न फिरता घरीच राहण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत झाली की आपण भारतात आप्तेष्टांना भेटण्यासाठी परतणार असल्याचेही त्यांनी साकाळी येथील प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.