बंगळुरू (वृत्तसंस्था ) ;- एका तरुणाला मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या एका तरुणीसोबत ऑनलाईन सेक्स करणे महागात पडले आहे. या तरुणीने तरुणाचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तरुणाने व्हिडीओ क्लिप व्हायरल होऊ नये म्हणून त्या तरुणीला 20 हजार रुपये दिले देखील मात्र तेवढ्यावर ती समाधानी झाली नाही. तिने आणखी पैसे मागितल्यानंतर त्या तरुणाने तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कर्नाटकमधील बंगळुरू शहरात घडला आहे.
बंगळुरू मध्ये राहणारा अंबित कुमार मिश्रा हा लग्नासाठी मुलगी शोधत होता. त्याच वेळी एका मॅट्रीमोनियल साईटवर त्याची ओळख श्रेयासोबत झाली. श्रेया हिने ती सॉफ्टेवेअर इंजिनियर असल्याचे सांगितले. अंबितला तिचे प्रोफाईल आवडल्याने ते दोघे व्हॉट्सअॅपवर बोलू लागले. बोलता बोलता त्याला श्रेया आवडू लागली. 6 फेब्रुवारीला ते दोघे एकमेकांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना श्रेयाने कपडे काढायला सुरुवात केली. त्यानंतर तिने व्हर्च्युअल सेक्ससाठी अंबितला देखील कपडे काढायला लावले. अंबितला तिच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे अंबित देखील कपडे काढू लागला. मात्र त्याचवेळी श्रेयाने तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. त्यामुळे अंबितचे सर्व अश्लील चाळे त्यात रेकॉर्ड झाले.
दुसऱ्या दिवशी अंबितच्या मोबाईलवर त्याचीच अश्लील व्हिडीओ क्लिप श्रेयाने पाठवली व त्याला 1 लाख रुपये देण्यास सांगितले. मात्र अंबितने त्याच्याकडे एवढे पैसे नसून 20 हजार रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर श्रेयाने ते 20 हजार रुपये घेतले व पुन्हा अंबितला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळेस त्याने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलीस श्रेयाचा शोध घेत आहेत.