नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेचे लाभार्थी असलेल्या ८१ कोटी नागरिकांना आणखी नऊ महिने पुरेल इतका मोठा अन्नधान्य साठा सध्या देशात आहे असे केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. आगामी काळात देशामध्ये गव्हाचेही विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असून, त्याचीही अन्नधान्याच्या साठ्यात भर पडणार आहे.
कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशामध्ये अन्नधान्याची वाहतूक व वाटप अतिशय कार्यक्षमतेने झाले असून ही ऐतिहासिक कामगिरी आहे. १० एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामांमध्ये सध्या तांदळाचा २९९.४५ लाख मेट्रिक टन, गव्हाचा २३५.३३ लाख मेट्रिक टन इतका मोठा साठा आहे. सार्वजनिक शिधावाटप यंत्रणेद्वारे देशात दर महिन्याला ६० मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले जाते. त्यामध्ये डाळींचाही समावेश आहे.