जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचेशी संलग्न असलेल्या एकूण १३७ महाविद्यालया मधील एकूण ५७७२५ विद्यार्थ्यांनी ८८००० हजाराहून अधिक परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) स्वत: डाऊनलोड केले. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांची महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला. या प्रणालीस विद्यार्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यापीठ पातळीवर शिक्षण क्षेत्रांमध्ये होत असलेल्या बदला मधील सर्वात महत्वाचा बदल मानला जात आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना थेट वेबपोर्टल वर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी विद्यापीठाचे परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. पी. पाटील यांनी एम. के. सि.एल. पुणे यांच्या मदतीने सदर व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून देण्या बाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केली. सदर प्रणाली तात्काळ कार्यरत होण्यासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रोफेसर डॉ. पी.पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रणाली कार्यरत झाल्यापासून विद्यार्थ्याना महाविद्यालया पर्यंत करावा लागणारा प्रवास,श्रम, वेळ वाचणार असून त्यासाठी लागणारा खर्च, महाविद्यालयात रांगेमध्ये उभे राहून परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून घेणे यामधून मुक्तता मिळाली आहे. आता विद्यार्थी आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रीत करू शकतील.
यापूर्वी सर्व महाविद्यालये परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) आपल्या लॉगीन मधून डाऊनलोड करून त्याची छपाई स्वत: करत होती. त्यानंतर सर्व परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वितरण केले जात होते. यामुळे महाविद्यालय प्रशासनावर अप्रत्यक्षपणे ताण पडत असे. आता उपलब्ध झालेल्या सोयीमुळे विद्यार्थ्यांना आपले परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट) प्रमाणित करून घेण्यासाठी महाविद्यालयात यावे लागते. या प्रणालीमुळे सर्व संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना परीक्षा प्रणाली अधिक उत्तम राबवण्यासाठी आपल्या सूचना विद्यापीठाच्या ई-सुविधा केंद्राशी sfc@nmuj.digitaluniversity.ac या ई मेल आयडीवर पाठवाव्यात असे कळविण्यात आले आहे.