मुंबई(वृत्तसंस्था ): विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेसाठी थेट “ऑफर’ देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं खडसे हे अस्वस्थ आहेत. ते पक्षांतराच्या निर्णयाप्रत आल्याचं सांगितलं जातं. भाजपला सोडचिठ्ठी देण्यासाठी त्यांच्यावर समर्थकांचाही दबाव आहे. हीच संधी साधत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं त्यांना ऑफर दिली आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजप चार, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन तर काँग्रेस एक जागा लढवू शकणार आहे. मात्र, या निवडणुकीत दोन जागा लढण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे. त्यासाठी एक उमेदवार घोषित करण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसनं खडसे यांच्याशी संपर्क साधल्याचं समजतं. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची चर्चा आहे. मात्र, खडसे यांना ही निवडणूक लढावी लागणार आहे. सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसतर्फे खडसेंची उमेदवारी असणार आहे. या जागेसाठी भाजपच्या उमेदवाराविरोधात खडसेंची लढत असेल. त्यासाठी त्यांना तब्बल 14 मतांची तजवीज करावी लागणार आहे. खडसे यांनी विधान परिषद निवडणूक लढण्याची तयारी दाखवल्यास ते भाजपची मतं सहज वळवू शकतात, असा काँग्रेसचा होरा आहे.