चाळीसगाव :आपले नाव स्वछता कर्मचाऱ्यांच्या पात्रता यादीत नसल्याने अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना आज येथे घडली असून सदर कर्मचाऱ्याचा मृतदेह पालिकेत आणल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण याठिकाणी निर्माण झाले होते.
वारसांना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते दोन लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आल्यानंतर अत्यंविधी करण्यात आला.

चाळीसगाव पालिकेत एकूण १८९ रोजंदारी स्वच्छता कर्मचारी आहेत. यापैकी २६ कर्मचाऱ्यांचे पात्र म्हणून समावेशन झाले आहे. २२ कर्मचाऱ्यांचे पालिका स्तरावर तर चार कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर समावेशन केले गेले आहे. उर्वरीत १५३ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांकडून नगरपरिषद संचालनायाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे
मृत जाधव हे गेल्या चाळीस वर्षापासून पालिकेत रोजंदारी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होते. मंगळवारी समावेशन झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची राज्यस्तरावरील यादी लावण्यात आली. यादीत नाव नसल्याने त्यांना धक्का बसला. बुधवारी सकाळी ते काम करीत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्याच्या वारसास नोकरी व तातडीची पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. कर्मचारी अडीच तास पालिकेत ठाण मांडून होते.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मध्यस्थी करीत दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. मदतीचा धनादेश मृत कर्मचारी शोभाबाई जाधव हिच्याकडे सुपूर्द केला. जाधव यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पात्र म्हणून समावेशन करावे. शासन स्तरावर उर्वरीत कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव त्वरीत पाठवावा. जाचक शैक्षणिक अट रद्द करण्याची मागणी रामचंद्र जाधव यांच्यासह गौतम जाधव, बबलू जाधव आदी उपस्थित होते.







