मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ बांधून केला जय महाराष्ट्र!

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) ;-येथील नगरपंचायतीमध्ये माजीमंत्री एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये असतांना १२ नगरसेवक निवडून येत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते . एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतरही या नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता . त्यामुळे ते सर्व नगरसेवक हे खडसे समर्थक समजले जातात. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन घालून ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून इतर चौघे नगरसेवक उद्या शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान खडसे गटाला मुक्ताईनगरात भगदाड पडले असून आ. चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे यशस्वी झाले आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज मुंबई येथे मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य जणांचा समावेश आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथराव खडसे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व असून आ. चंद्रकांत पाटील हे खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात . त्यांनी विधानसभा निवडणुकीत खडसे यांची मुलगी रोहिणीताई खडसे यांचा पराभव केला होता. आता मुक्ताईनगर तालुक्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या झंझावाती कार्यपद्धतीने तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अनेकांचा शिवसेनेकडे वाढता कल दिसून येत आहे . त्यामुळे आ. चंद्रकांत पाटील आणि ना. गुलाबराव पाटील यांनी नाराज असलेल्याना शिवसेनेत आणल्याचे डावपेच यशस्वी झाल्याने एकनाथराव खडसेंना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.







