नवी दिल्ली(वृत्तसंस्था );- करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार हे मंगळवारी सकाळी १० वाजता कळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (११ एप्रिल रोजी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मोदी देशातील जनतेला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ‘मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार नाहीत,’ अशी माहिती भारत सरकारनेच जारी केली होती. त्यामुळेच त्या बैठकीनंतर दोन दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या लॉकडाउनसंदर्भातील महत्वाच्या निर्णयांची घोषणा पंतप्रधान करतील असं सांगितलं जात आहे.