नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असतानाच हा लढा लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अधिकाधिक कठीण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला काही दिवसांपूर्वी आपातकालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता भारतात अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे.
भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी अमेरिकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आले आहे.
अद्याप कोणतेही औषध शरीरात प्रवेश केलेल्या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी बनवण्यात आलेले नाही. पण, कोरोनाचा सामना करणाऱ्या शरीरात अँटिबॉडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.