जळगाव ;- मुस्लिम बांधव पूर्ण महिनाभर रोझे ठेवून, नमाज व ईतर सर्व इबादत (धार्मिक विधी ) करून स्वतः केलेल्या नेक आमाल (पुण्य ) चा ईनाम (मोबदला) ईद – ऊल – फीत्र (रमझान ईद )च्या पवित्र दिवशी अल्लाह कडून बंद्यांना (माणसाला ) भरघोस मिळतो. ईद च्या दिवशी सर्वत्र उत्साह, आनंदला उधाण आलेले असते. लोक नवीन कपडे, पादत्राणे घालून, ईत्र (सुगंध)व सुरमा लावून ईदगाह वर जाऊन सामूहिकरित्या नमाज – ए – ईद – ऊल – फीत्र अदा (पठन ) करून एक दुसऱ्यांना आलिंगन देऊन गळाभेट घेऊन मुसाफा ( हस्तांदोलन) करून ईद मुबारक म्हणत ईद च्या शुभेच्छा देतात. मोठे लोक आपल्या पेक्षा लहानांना ईदी (पैशे किंवा भेट वस्तू ) देतात. परंतु सध्या कोरोना चा सर्वत्र त्रास सुरु असल्यामुळे हे सर्व केल्यास कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळेच कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकडाऊन चे तंतोतंत पालन करून व सोशल डिस्टनिंग ठेवून ईद घरीच साजरी करण्यासाठी सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा , सुन्नी ईदगाह ट्रस्ट, सुन्नी रुयते हिलाल कमिटी तसेच सर्व धर्मगुरू, मशिदिंचे ट्रस्टी, व सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ईद शांततेत लॉक डाऊन चे पालन करून आज दि. 25 सोमवार रोजी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी सुन्नी ईदगाह मैदान नियाज अली नगर येथे किंवा अन्य कोठेही सामुहिकरित्या नमाज पठन न करता मुस्लिम बांधवांनी घरीच 4 रकात नमाज – ए – चाष्त व सलातो सलाम, फातेहा खानी व कोरोना पासुन सर्वांचे रक्षण होऊन कोरोना चा खात्मा व्हावा व जे कोरोना योद्धे कोरोनाशी लढा देत आहेत त्यांचे रक्षण करून त्यांना लढण्यासाठी शक्ती मिळो, जे आजारी आहेत त्यांना शिफा – ए – कामिला (पूर्ण स्वास्थ ) मिळो अशी दुआ (प्रार्थना )अल्लाह कडे करण्यात येऊन त्यास सर्वांनी आमीन सुम्मा आमीन म्हटले अश्या प्रकारे सर्व इबादत घरातच करून ईद – ऊल – फीत्र साजरी करण्यात आली.
ईद लॉक डाऊनचे तंतोतंत पालन होऊन कोरोना चा प्रादुर्भाव टाळून सर्वांचे संरक्षण होऊन साजरी करण्यासाठी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव, सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा चे अध्यक्ष सै. व सुन्नी रुयते हिलाल कमिटीचे सदस्य सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, मौलाना मोईनुद्दीन वास्ती, मौलाना अब्दुल माजिद, इकबाल वझीर, मुख्तार शाह, मौलाना राकीब आलम, मौलाना अब्दुल रहीम, रशीद हवालदार सै. जावेद, सिकंदर रझवी यांनी अथक परिश्रम घेतले.