जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील पाण्याच्या टाकीजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून दांपत्याला चौघांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच धारदार चॉपरने चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यास आले असता दोन इसमांनादेखील धारदार शस्त्राने मारून संशयित आरोपींनी दुखापत केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया मुकेश पाटील (वय २९, रा. शिरसोली ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवार दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर संशयित आरोपी ज्ञानेश्वर युवराज पाटील, खुशाल माना बारी, बापू मिस्तरी, अमोल बंडू पवार (सर्व रा. शिरसोली) यांनी फिर्यादीचे पती मुकेश अशोक पाटील (वय ३४) यांना जबर मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कैलास मिस्त्री याने त्याच्या हातातील धारदार चॉपरने चेहऱ्यावर मारून चेहऱ्याचे विद्रूपीकरण केले. फिर्यादी छाया पाटील भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली.
तसेच छाया पाटील यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ हत्याराने मारून दुखापत केली. भांडण सोडवण्यास आलेले गोरक्ष शरद पाटील यांच्या डाव्या मांडीवर मागच्या बाजूला तर गगन माधव चव्हाण यांच्या डाव्या हाताला संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मारून दुखापत केली आहे. याबाबत छाया मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.









