प्रशासनाकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा, घरपट्टी किंवा वीज बिल यांसारखी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका, असा इशारा केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने दिला आहे.
विशेषतः काही सेवाभावी कंपन्या किंवा गट तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या पॅन कार्डचा वापर करून जीएसटी नोंदणी करू शकतात. त्यामुळे तुमचे नाव अशा प्रकारच्या बोगस व्यवहारांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का, हे तपासण्यासाठी gst.gov.in > Search Taxpayer > Search by PAN या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवता येईल. जर तुमच्या पॅन कार्डचा वापर करून जीएसटी नोंदणी झाली असेल, तर त्वरित केंद्रीय जी.एस.टी. विभागाशी संपर्क साधावा. यासाठी जी.एस.टी. भवन, नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर येथील विभागीय कार्यालये मदत करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खासगी कागदपत्रे देऊ नयेत. कोणत्याही शंकेस्पद व्यवहाराची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
संपर्कासाठी कार्यालयीन पत्ते आणि क्रमांक
नाशिक: 0253-2313299
जळगाव: 0257-2224844
धुळे: 02562-270465
अहमदनगर: 0241-2451342