भुसावळ ( प्रतिनिधी ) – सुलभ कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकदा लुट होत असल्याच्या घटना घडतात. असाच प्रकार भुसावळात घडला असून भामट्यांनी चक्क नकली नोटा देऊन एकाची फसवणूक केली आहे. या संदर्भात पोलिसातील तक्रारीत म्हटले आहे की, कल्याण येथील मंगेश गुलाबराव वाडेकर यांनी फेसबुकवर कोणतेही कागदपत्रे न देता शैक्षणिक कर्ज हवे आहे का? अशी जाहिरात पाहून संबंधीतांना संपर्क केला.
यानंतर समोरच्या कथित कर्ज देणार्यांनी त्यांना यासाठी एक लाख रूपये मागितले. यानुसार, ते ३० ऑगस्टला कल्याण येथून कारने भुसावळात आले. ते प्रवासात असतांना त्यांना दहा लाख कर्जाच्या बदल्यात आम्हाला एक लाख रुपये रोख द्यावे लागतील असे सांगितले. वाडेकर यांनी पारोळा येथील स्टेट बँकेतून एक लाख काढले. मंगळवारी सायंकाळी भुसावळात रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांना विकास म्हात्रे व राजेश पाटील हे दोन जण भेटले. यातील एकाने त्यांच्याकडून आधी रोख एक लाख रुपये घेतले. नंतर कर्जाचे दहा लाख आहेत असे सांगून एक बॅग सोपली. त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी १ लाखांचे असे एकूण १० बंडल आहे असे त्यांना सांगण्यात आले होते.
यानंतर वाडकर हे आल्या मार्गाने परत कल्याणकडे निघाले. रस्त्यात पारोळा येथील स्टेट बँकेत पैशांचा भरणा करण्यासाठी गेले असता यात प्रत्येक बंडलावरील आणि खालची प्रत्येकी एक नोट खरी तर मधल्या सर्व नोटा नकली असल्याचे निदर्शनास आल्याने ते हादरले. लहान मुलांना खेळण्यासाठीच्या या नोटा असल्याचे तपासणीत दिसून आले. यात त्यांची ९५ हजार रूपयात फसवणूक झाली.
यामुळे त्यांनी या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यांनी फिर्याद दिल्यानुसार विकास म्हात्रे व राजेश पाटील या दोन जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश भोये तपास करत आहेत.