जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची बनावट सही करून विद्यार्थी विभागाच्या मेलचा वापर करून युनायटेड किंगडम विद्यापीठाला शिफारस पत्र पाठवून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२०-२१ या कालावधीमध्ये विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जयंत गोपाळ यांनी काम केले. दरम्यान त्यांची ओळख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहाय्यक संजय पाथरूड यांच्याशी झाली. दरम्यान डॉ. जयंत गोपाळ यांना पुढील शिक्षणासाठी युनायटेड किंग्डम येथील विद्यापीठाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिफारस पत्र आवश्यक असल्याने त्यांनी संजय पाथरूड यांच्याशी संपर्क साधला. संजय पाथरूड यांनी विद्यार्थी विभागाचा मेल आयडीचा वापर करून शिफारस पत्रावर अधिष्ठातांची कोणतीही स्वाक्षरी नसताना स्वतः सही करून मेल पाठविला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला देईलेल्या तक्रारीवरून बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी संजय पाथरूड यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वंदना राठोड करीत आहे.