साक्षीदाराचा अपघात घडवत मारहाण

जामनेर ( प्रतिनिधी) – कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली पाऊण कोटीची फसवणूक करून जाब विचारल्यावर फसवणूक करणारानेच
साक्षीदाराचा अपघात घडवत मारहाण केल्याची घटना जामनेर येथे घडली आहे.
जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील रहिवाशी तुषार पाटील व मनिषा पाटील हे लॉर्ड एसपी युनिव्हर्सल सर्व्हिसेस प्रा. लि. व एसपी टेक्नोलॉजीचे संचालक आहेत. त्यांनी ओएफसी अंडरग्राऊंड प्रोजेक्टचे काम अमोल चव्हाण ( श्री इंटरप्राईजेस जामनेर) यांना मिळवून देण्याचे मान्य केले होते. परंतु कामात फसवणूक झाल्याचा प्रकार राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केला.
तुषार पाटील ( कॉन्ट्रॅक्टर ) यांनी अमोल चव्हाण यास ओएफसी अंडरग्राउंड प्रोजेक्टचे काम लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद , बुलढाणा, जळगाव, धुळे याठिकाणी सुरू होत असून तो कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देतो असे सांगितले त्या नंतर दोघांमध्ये कच्च्या माला संदर्भात करार झाला . अमोल चव्हाण यांनी ३ आँगस्ट २०२० रोजी कच्च्या मालासाठी ७८ लाख ५० हजार अनामत रक्कम तुषार पाटील यांच्या खात्यात जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर काही महिन्यांनी काम चालू न झाल्याने, तुषार पाटीलशी संवाद साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मी रक्कम परत करतो असे सांगून काही दिवसांनी १५ लाख २० हजार परत केले. त्यानंतर त्यांनी बाकीची रक्कम ४ आक्टोबर २०२१ ते १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत परत करणार असल्याचे नोटरीमध्ये लिहून दिले. परंतु या कालावधीत कॉन्ट्रॅक्टर तुषार पाटील यांच्याकडून कोणतीही रक्कम परत केली गेली नाही.
हा वाद भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहचल्यावर सगळ्यांची बैठक झाली. नंतर आमदार गिरीश महाजन यांच्या शब्दालादेखील तुषार पाटील यांनी दुजोरा दिल्याचे अमोल चव्हाण यांचे बंधू राहुल चव्हाण यांनी सांगितले.
लाखो रुपये अडकल्यामुळे त्रस्त असलेले अमोल चव्हाण काही दिवसापासून घरी परतले नाहीत . तसा ते बेपत्ता झाल्याचा गुन्हा जामनेर पोलीस ठाण्यात दाखल आहे. राहुल चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी २६ नोव्हेंबर , २०२१ रोजी जामनेर तालुक्यात अमोल चव्हाण यास शोधण्यास सुरुवात केली. प्रमोद खामानकर हा नोटरीमधील साक्षीदार व अन्य सहकारी यांनी पळासखेडा, केकत निंभोरा व नेरीपर्यंत अमोल चव्हाण यास शोधण्यास सुरुवात केली असता ते जामनेरला माघारी येत असताना केकत निंभोरा रस्त्यापुढील पीर बाबा दर्गा जवळ तुषार पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रमोद खामनकर याच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी , काठ्यांनी जबर मार दिला. प्रमोद खामंनकर याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे. त्यास राहुल चव्हाण यांनी जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रमोद खामंनकर याने प्राणघातक मारहाणीचा गुन्हा जामनेर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे . पुढील तपास चालू आहे. राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , तुषार पाटील यांनी आमच्यावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा खोटारडेपणा समोर आणून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी आमची पोलिसांकडे मागणी आहे .







