एलसीबीची कामगिरी : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : एलसीबी पोलिसांच्या तावडीतून बेडयांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरुण, जळगाव) याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे.
एलसीबीचे पथक दोन्ही आरोपींना जळगाव येथून अमळनेरकडे घेऊन येत होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजता कुऱ्हे गावाजवळ सती माता मंदिराच्या अंडरपासमध्ये वाहनाचा वेग कमी होताच, दोघांनी मागच्या सीटवरून उडी मारली. बेड्या लागलेल्या असतानाही त्यांनी अंधाराचा फायदा घेतला आणि रेल्वे रुळ ओलांडून शेतात पसार झाले होते. यामुळे आरोपीना आणणाऱ्या जबाबदार चारही पोलिसांचे निलंबन झाले आहे.
अमजद कुरेशी याची एक पत्नी हि दिल्ली येथे राहते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तर इतर तांत्रिक मुद्यांच्या आधारेदेखील पोलिसांनी शोध घेतला असता त्यातील अमजद कुरेशी दिल्ली येथे आढळून आला. एलसीबी पोलिसांनी त्याला पकडून अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदर आरोपीला दिल्ली येथून अटक करणेकामी पीएसआय जितेंद्र वल्टे, ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, संदीप पाटील, राहुल कोळी, दीपक चौधरी यांनी मेहनत घेतली. दरम्यान, अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.









