अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- फायनान्स कंपनीकडे तारण ठेवलेल्या घरात अतिक्रमण करून दादागिरी करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरसे गल्लीतील ओम ट्रेडर्सचे प्रोप्रायटर योगेश चुडामन शेटे, शैला चुडामन शेटे, भूमिका योगेश शेटे, चुडामन सोनू शेटे यांनी त्यांची मिळकत कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड या फायनान्स कंपनीकडून ३१ डिसेम्बर २१ रोजी ४२ लाख ८८ हजार ४४२ रुपये कर्ज घेतले होते. ओम ट्रेडर्सकडे फायनान्स कंपनीचे ४५ लाख ३८ हजार रुपये आणि त्यावरील व्याज थकीत आहे. कंपनीने वारंवार नोटिसा देऊन व मागणी करूनही शेटे परिवाराने थकीत बाकी भरली नाही. म्हणून कंपनीने वसुलीसाठी मालमतेचा ताबा मिळावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना २१ मे रोजी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार राजेंद्र ढोले, मंडळाधिकारी अमळनेर, पोलीस सूर्यकांत साळुंखे, कंपनी प्रतिनिधी विशाल विलास चव्हाण यांनी मालमत्ता सील करून कंपनीच्या ताब्यात दिले होते. दि. १८ ऑक्टोबर रोजी विशाल चव्हाण हे मिळकत पाहायला गेले असता मागील बाजूस सीलबंद केलेल्या रूमचे सील तोडून शेटे परिवार तेथे राहत होता.
त्यांना सील का तोडले असे विचारले असता आम्ही येथे राहू, घर खाली करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, आम्ही घरावर चढून जीव देऊ आणि तुमचे नाव टाकून देऊ अशी धमकी दिली. चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.