मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली नाही. किंवा विधाने मागे घेतली नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्यात येईल.
त्यांच्याविरोधात मानहानी दावा निश्चितपणे दाखल करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे.
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणापासून राज्यात सुरू असलेला वाद अजून शमण्याची चिन्हं दिसत नाही. सुरुवातीला ड्रग्ज प्रकरण आर्यन खान भोवती फिरत होते. आता ड्रग्ज प्रकरण वाद आता राजकीय झाला आहे. नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबीवर आणि त्यासोबतच भाजपवर देखील आरोप केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत. आता मलिक आणि फडणवीस वाद उभा राहिला आहे.
मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर खान यांनी आता फडणवीसांवर पलटवार केला आहे. निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट 5 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. फडणवीसांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा आणि फौजदारीचा दावा ठोकला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली नाही. किंवा विधाने मागे घेतली नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले. माझ्या जावयाकडे ड्रग्ज किंवा अमली पदार्थ सापडलेले नाही. तसा पंचनाम्यात उल्लेख आहे. असे असताना फडणवीस यांनी ड्रग्जचे आरोप करणे चुकीचे आहेत, असे मलिक म्हणाले.
दरम्यान, निलोफर खान यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. “चुकीच्या आरोपांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होतात. एखाद्या व्यक्तीने आरोप करताना किंवा निषेध करताना आपण काय बोलतोय याचे भान ठेवायला हवे. माझ्या कुटुंबावर देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या चुकीच्या आरोपांसाठी ही अब्रुनुकसानीची नोटीस मी पाठवली आहे. आम्ही आता मागे हटणार नाही, असे या ट्विटमध्ये निलोफर खान यांनी म्हटलेय.