पाचोरा रेल्वे स्टेशनजवळची घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – सुसाट जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोर आल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ५ वाजेचे सुमारास पाचोरा स्थानकानजीकच्या उड्डाणपुलाजवळ घडली आहे. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

किशोर सुपडू पाटील (४५, कृष्णापुरी, पाचोरा) हा इसम अप लाइनवर नागपूर-पुणे या वंदे भारत एक्स्प्रेससमोर आल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या हातावर गोंदवलेल्या नावावरून ओळख पटली. तत्काळ कृष्णापुरी भागातील नागरिकांनी इसमाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. वंदे भारतच्या लोको पायलटने स्टेशन प्रबंधकांना गाडीसमोर इसम आल्याची खबर दिली. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुले असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.








