मुंबई (वृत्तसंस्था ) – कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खानसह आतापर्यंत १४ जणांची चौकशी करून त्यांची जबानी नोंदवून घेतली आहे. आर्यन खानचा जबाब एनसीबी बेलापूरच्या कार्यालयात नोंदवून घेण्यात आला.

तर पंच प्रभाकर साईलची दोन दिवस चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.
एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने यावेळी काही महत्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. क्राईम सिनला भेट देऊन नाट्यरूपांतर करण्यात आले. तसेच काही इलेक्ट्रॉनिक पुरावेही ताब्यात घेतले आहेत. आणखी काही जणांना यामध्ये सहभागी करून त्यांची चौकशी करायची आहे. त्यानंतरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. किरण गोसावीची चौकशी करण्यासाठी एनसीबीकडून कोर्टात अर्ज करण्यात आला असून सोमवारी त्यावर सुनावणी आहे.
प्रभाकर साईलची दोन दिवस सलग चौकशी करण्यात आली आणि गरज पडल्यास पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावले जाईल,असे सिंह यांनी सांगितले. तपासात सहकार्य करण्यासाठी आणि काही सीसीटीव्ही मिळावेत म्हणून आम्ही मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. मुंबई पोलिसांकडून काही सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहेत, काही मिळायचे बाकी असल्याचे सिंह यांनी सांगितले.
यावेळी ज्ञानदेव सिंह यांनी तपास कार्य वेगवान झाल्याचे सांगितले. आज प्रभाकर साईल याचा जबाब नोंदवून त्याची चौकशी करण्यात आली. आता के. पी. गोसावी याचा जबाब होण्याची वाट पाहतोय. तो न्यायालयीन कोठडीत गेला की लगेचच आम्ही पुन्हा कोर्टात अर्ज करू आणि त्याची चौकशी करू, असे ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.







