कासोदा पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील आंबे-बाम्हणे येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशाने राबवण्यात आलेल्या ‘ऑल आऊट स्किम’ मोहिमेअंतर्गत कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या ‘ऑल आऊट स्किम’ मोहिमेअंतर्गत कासोदा पोलिसांनी एरंडोल तालुक्यातील आंबे-बाम्हणे गावात धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवलेला दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत किरण भारत पाटील (वय-३९, रा. ब्राम्हणे, ता. एरंडोल) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून देशी व विदेशी दारूच्या एकूण ₹३८,१७५/- किमतीच्या विविध बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
रविवार, २१ जुलै रोजी रात्री ८ वाजता, सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आंबे-बाम्हणे येथील ताडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चाऱ्याच्या कुट्टीच्या पत्री शेडच्या आडोशाला छापा टाकला. यावेळी किरण भारत पाटील हा विनापरवाना व बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारूचा साठा बाळगताना रंगेहाथ पकडला गेला.
*पोलिसांनी किरण पाटील याच्या ताब्यातून एकूण जप्त केलेल्या दारूसाठ्याची किंमत ३८ हजार १७५ आहे. याप्रकरणी संशयित आरोपी किरण भारत पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.