विश्लेषण : एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत रंगत आहे. यंदा आ. चिमणराव पाटील यांनी मुलाला तिकीट मिळवून दिल्याने नवीन उमेदवार महायुतीकडून देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील हे पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहे. तर त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी पारंपारिक आ. चिमणराव पाटील यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून मिळाली आहे. या लढतीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खा. ए. टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉ. संभाजीराजे पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर डॉ. हर्षल माने यांच्यासह अपक्ष उमेदवार भगवान महाजन हे देखील प्रभावशाली उमेदवार मते खेचण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे मतांचे होणारे विभाजन नेमके महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल हे पाहण्यासारखे आहे.
तसेच दोन्ही कडील मित्र पक्षांची भूमिका या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. मागील पंचवार्षिकला २०१९ साली शिवसेनेचे चिमणराव पाटील यांना ८२ हजार ६५० तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सतीश पाटील यांना ६४ हजार ६४८ एवढी मते मिळाली होती तर अपक्ष गोविंद शिरोळे यांनी देखील २४ हजार ५८७ मध्ये मिळवून आपला प्रभाव दाखवला होता.
या मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५५१ एवढी मतदार असून पुरुष १ लाख ५० हजार ५८१, महिला १ लाख ४२ हजार ९६० तर १० तृतीयपंथी मतदार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून स्मिता वाघ यांना मताधिक्य अधिक मिळाले होते.