पणजी (वृत्तसंस्था ) इंग्लंडच्या नव्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गोव्यातील वडिलोपार्जित जमीन भूमाफियांनी बळकावली आहे. ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्यात आल्याचे या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने म्हटले आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पणजीपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसगांवमधल्या 2 जमिनी बळकावण्यात आल्या असून यांचे क्षेत्रफळ हे जवळपास 13 हजार 900 स्क्वेअर मीटर इतके आहे.
गोवा सरकारने जमीन बळकावणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. याबाबत कळाल्यानंतर सुएला ब्रेव्हरमन यांची वडील ख्रिस्टी फर्नांडीस यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना कळाले की त्यांची जमीन बळकावण्यात आली आहे. हे कळाल्यानंतर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे रितसर तक्रार दिली होती. ही तक्रार विशेष तपास पथकाकडे पाठवण्यात आली होती.