अक्षय शिंदे याच्या वडिलांचे पत्र सीआयडीकडे वर्ग
ठाणे (वृत्तसेवा) : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केली आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना याबाबतचं पत्र दिलं आहे. मुंब्रा पोलिसांनी हे पत्र आता सीआयडीकडे दिलं आहे. सीआयडी आता सर्व आरोपांची पडताळणी करुन योग्य ती कारवाई करणार आहे. विशेष म्हणजे सीआयडीकडे संबंधित प्रकरण वर्ग करताच सीआयडी पथक कामाला लागलं आहे.
संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी २३ सप्टेंबरला संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता. एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांच्या कथित माहितीनुसार, अक्षयने सहायक पोलीस निरीक्षकाच्या कंबरेला असलेली पिस्तूल हिसकावली आणि गाडीतील पोलीस पथकाच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी एक गोळी ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीला लागून आरपार गेली. तर दोन गोळ्यांचा निशाणा चुकला. यावेळी प्रसंगावधान साधत एका पोलीस अधिकाऱ्याने अक्षयच्या दिशेला गोळी झाडली. यामुळे अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन वातावरण तापताना दिसत आहे. विरोधकांनी देखील या घटनेवरुन सरकारला घेरलं आहे.
अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडूनही पोलिसांवर आरोप केला जातोय. अक्षय शिंदे याचा कथित एन्काऊंटर झाल्यापासून त्याच्या कुटुंबियांकडून पहिल्या दिवसांपासून पोलिसांवर आरोप केले जात आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टातदेखील हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना पत्र दिलं. या पत्रात ज्या पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. पण आता या प्रकरणाचा पूर्ण तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याने हे पत्र सीआयडीला देण्यात आलं आहे. याप्रकरणी आता सीआयडीकडून योग्य ती कारवाई केली जाणार आहे.