आ. एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत मागणी
नागपूर (विशेष वृत्तसेवा) :- सध्या राज्याचे अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषदेत आ. एकनाथराव खडसे यांनी ग्रंथालय विधेयकावर सभागृहात प्रभावी भूमिका मांडली आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, पुस्तकांना अनुदान द्या, जुने पुस्तके शासकीय दराने लोकांना मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी त्यांनी भाषणात केली.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम १९६७ यामध्ये सुधारणा करण्याविषयी आ. खडसे यांनी नापसंती व्यक्त केली. नवीन ग्रंथालयांनासन २०१२ पासून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. शासन एवढे उदासीन का ? असा सवाल त्यांनी व्यक्त केला. शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये ग्रंथालयाला अनुदान मिळाले पाहिजे. शताब्दी साजरी करणाऱ्या ग्रंथालयांचा सन्मान करायला हवा. त्याचं मूल्यमापन करून अनुदान द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रंथालय बांधकामासाठी भरीव अनुदान दिले पाहिजे. ग्रंथापाल नियुक्त करताना समान वेतनश्रेणी दिली पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाषणामध्ये शताब्दी पूर्ण करणाऱ्या भुसावळ, चाळीसगाव येथील वाचनालयासह अमळनेरचे साने गुरुजी वाचनालय आणि जळगावच्या व. वा. वाचनालयाचा उल्लेख त्यांनी केला. या वाचनालयांमधील ग्रंथपालांनी ग्रंथालय वाढवली, जोपासली. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा शासकीय सत्कार केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, पुस्तकांना अनुदान द्या, जुने पुस्तके शासकीय दराने लोकांना मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली ही गौरवाची बाब असल्याचे सांगत संविधानाची पुस्तके ग्रंथालयांना मोफत वाटली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. किती जणांनी आजवर संविधान हातात घेतले आहे ? असा गंभीर सवाल विचारत शासकीय खर्चाने संविधान छापून लोकांना मोफत वाटले पाहिजे असे त्यांनी सांगितले.