घरकुल, दफनभूमी आणि सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
पाचोरा ( प्रतिनिधी ) : – एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने दिनांक १८ जून रोजी, पाचोरा येथील गट विकास अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पाचोरा तालुक्यातील मौजे सामनेर आणि मौजे वडगाव बुद्रुक येथील आदिवासी नागरिकांसाठी घरकुलासाठी जागा, दफनभूमी आणि सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सामनेर आणि वडगाव बुद्रुक येथील आदिवासी कुटुंबांकडे स्वतःची हक्काची जागा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक वारंवार विनंती करूनही या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असून, शासनाच्या विविध योजनांपासून आदिवासी बांधवांना वंचित ठेवत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
आदिवासी कुटुंबांना शासनाच्या धोरणानुसार व योजनेनुसार घरकुलासाठी जागा उपलब्ध करून घरकुलाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, गावातील सरपंच आणि ग्रामसेवक हे राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून आदिवासींवर अन्याय करत असून, काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या नावे बेकायदेशीररित्या जमिनी करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने आदिवासी कुटुंबे गावात राहत असूनही त्यांना दफनविधीसाठी जागा आणि सभागृह उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे दफनभूमी आणि सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या आदिवासी जमातीचे लोक पूर्वीपासून पक्क्या घरांमध्ये अतिक्रमित जागेवर राहत आहेत, त्यांची घरे नियमानुसार करून मिळावीत. ज्या कुटुंबांकडे जागा नाही, त्यांना शासनाच्या मालकीच्या जागेत घरकुलासाठी जागा उपलब्ध करून घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा. तसेच, आदिवासी जमातीच्या नागरिकांसाठी दफनभूमी आणि सभागृहासाठीही जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करत गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निर्देश देऊन न्याय मिळवून देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.