नशिराबाद गावातील वाड्यावस्त्यांना दिली भेट
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी नशिराबाद बीटमधील विद्यार्थी प्रवेश नोंदणीचा सखोल आढावा घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पवार यांनी नशिराबाद गावातील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये शाळा प्रवेशाबाबत जनजागृती केली.
यावेळी जिल्हा परिषद कन्या शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक जगदीश चौधरी, शिक्षिका सोनाली साळुंखे, नीता कापडणे, मनीषा भंगाळे, तसेच केंद्र शाळेचे शिक्षक तुषार सोनवणे यांनी पटनोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी कार्यवाही केली जाईल, असे विजय पवार यांनी सांगितले. नशिराबाद आणि शिरसोली बीटमधील सर्व जिल्हा परिषद मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पटनोंदणी करून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.