अमळनेर तालुक्यात मुडी मांडळ रस्त्यावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : वाळूचे ट्रॅक्टर पकडून दिल्याच्या संशयावरून मुडी प्र. डांगरी येथील एकाला वाळू माफियांनी हल्ला करीत मारहाण केल्याची घटना दि. १७ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवासी, ह.मु. नाशिक येथील कमलाकर माधवराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कामानिमित्त गावी मुडी प्र. डांगरी येथे आले होते. दि. १७ रोजी रात्री ११ वाजता मित्रासोबत मांडळ येथील दवाखान्यातून परत येत असताना मुडी मांडळ रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ एका इसमाने त्यांची गाडी अडवली. त्यांच्या मित्रासोबत वाद घालू लागल्याने कमलाकर हे मध्यस्थी करू लागले. त्यावेळी, तू रेतीचे ट्रॅक्टर पकडून देतो, तुला जिवंत सोडणार नाही असे सांगत न्हानु पोपट कोळी, राहुल पोपट कोळी, संतोष रामदास कोळी यांनी कमलाकर याला शिवीगाळ करत मारहाण करू लागले. त्याचे शर्ट फाडून मोबाईल फेकत काठ्यांनी मारहाण केली. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इसमांनी त्यांची सोडवणूक केली. कमलाकर याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.









