जवळपास दोन लाखांची रोकड लंपास
जळगाव (प्रतिनिधी): – जळगाव शहरालगतच्या सावखेडा शिवारात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद माजवत एका रात्रीत चार शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ ते २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी वर्धमान सीबीएसई स्कूल, जी.एस. रायसोनी पब्लिक स्कूल, शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स या चार शाळांच्या मुख्य दरवाजांची कुलुपे तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी विशेषतः शाळांच्या अॅडमिन रूमवर हात मारत ड्रॉवरमधील १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. शहरात आधीच सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत; त्यात आता शैक्षणिक संस्थाच ‘टार्गेट’ झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. घटनेनंतर वर्धमान शाळेचे प्राचार्य आशिष अजमेरा यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेनंतर परिसरातील इतर शाळांनीही सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.









