कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी वेठीस
जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले असून यामुळे महाविद्यालयीन व विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटना आणि राज्य शासनाच्या खेळ खंडोब्यात विद्यार्थ्यांचा बळी दिला जात असल्याची भावना आता विद्यापीठाच्या वर्तुळात निर्माण झाली आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखणीसह अवजार बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १ ऑकटोम्बर पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत मंगळवारी सायंकाळी एकमताने घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. पी पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची ऑनलाईन बैठक झाली.या बैठकीत मंडळाच्या सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले.
२४ सप्टेंबर पासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच १ ऑक्टोम्बर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सहा दिवसांपासून परीक्षांबाबतची सर्व कामे ठप्प झाली आहेत.या परिस्थितीत ऑफलाईन व ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही.त्यामुळे या परीक्षा तुर्त पुढे ढकलाव्यात अशी सर्व सदस्यांनी एकमताने भावना व्यक्त केली.कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय या परीक्षा घेणे शक्य नाही असेही मत सदस्यांकडून मांडण्यात आले.
अखेर कुलगुरू प्रा पी पी पाटील यांनी सर्व सदस्यांचे मत जाणून या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व परीक्षेच्या पुढील तारखा व नवीन वेळापत्रक आंदोलनाची परिस्थिती पाहून जाहीर केले जाईल असे सांगितले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी पी पाटील यांनी दिली. या बैठकीत प्र- कुलगुरू , सर्व अधिष्ठाते, सहयोगी अधिष्ठाते व सदस्य उपस्थित होते. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांचा बळी दिला जात असल्याची भावना व्यक्त होत असून आता परीक्षा कधी होतील, याची चिंता आणखी वाढली आहे. यंदाचे शैक्षणिक सत्र हे कोरोनामुळे वाया गेले असून आता परीक्षांचाही खेळखंडोबा सुरु झाला आहे.







