यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुसखेडा ते थोरगव्हाण रस्त्यावरच्या मांगी-रिधुरी फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात करंजी येथील २४ वर्षीय तरुण विजय विनोद कोळी याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच करुण अंत झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कोळी हा मंगळवारी सकाळी आपल्या (एमएच १९, डीजे-४६९४) या दुचाकीवरून बोरावल येथे त्यांच्या आत्याची भेट घेण्यासाठी निघाला होता. मात्र, दुसखेडा ते थोरगव्हाण मार्गावर मांगी-रिधुरी फाट्याजवळ येताच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती प्रवाशांनी फैजपूर पोलिसांना दिल्यानंतर स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील व रवींद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविला. या प्रकरणी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मयत विजय कोळी यांच्या निधनाने करंजी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि केवळ चार महिन्यांची कन्या असा परिवार असून, अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









