जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील घटना
प्रशासनाकडून पंचनामा, तपासणीसाठी नमुने संकलित
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मन्यारखेडा येथील तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १५ जून रोजी सकाळी उघडकीस आली. जवळच असलेल्या एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत.
आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. या तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी दि. १५ जून रोजी ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या. नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते. या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने मन्यारखेडा गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना लक्षणे जाणवतात काय हे तपासले जाईल. मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते अशीहि माहिती मिळाल्याने त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत.