जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील अजिंठा चौक परिसरात लागोपाठ २ अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतर आता अपघातांची मालिका सुरु झाल्याचे दुर्दैवाने दिसून येत आहे. तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीवर आलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिराने सुरु होते.
पंकज शंकर कोळी (वय-२६) आणि कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय-२७, दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव आहे. पंकज कोळीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. (केसीएन)तर अमोल कोळीच्या पश्चातही आई, वडील, भाऊ, बहीण तसेच पत्नी व दीड वर्षांची मुलगी आहे. दोन्हीही सेंट्रिंग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. हे दोघे मित्र कामावरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ३४४६)ने घरी घार्डी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ दोघांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपर (एमएच १९ झेड ८०६७) ने धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील पंकज आणि अमोल या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. (केसीएन)तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.