चाळीसगाव शहरातील वाघळी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे एका दूध व्यवसायिक प्रौढाच्या घरी ते बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी मध्यरात्री धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत महादू खैरे (वय ७३ रा. वाघळी ता. चाळीसगाव) यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते शेती काम व दूध व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. (केसीएन)भागवत खैरे हे शनिवारी दि. ८ मार्च रोजी रात्री बाहेरगावी गेले असताना मध्यरात्री कधीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यात २ लाख ५० हजार रुपये रोख, १ लाख ४० हजार रुपयांच्या २ सोन्याच्या बांगड्या, ३५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ५२ हजार ५०० रुपयांच्या ३ सोन्याच्या अंगठ्या आणि ७० हजार रुपयांची मंगलपोत असा एकूण ५ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धात्रक करीत आहेत.