चाळीसगाव तालुक्यात हिरापूर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिरापूर गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना दि. १३ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक बाळू मेटकर (वय ३७, रा. तळेगाव ता. चाळीसगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनायक मेटकर आणि त्याचा मित्र शुभम बाळकृष्ण देशमुख हे दोघे जण (एमएच १९ डीव्ही १८७४) या दुचाकीने चाळीसगावकडून तळेगावकडे जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या (एमएच ४८ पी ४४३९) या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विनायक मेटकर हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला शुभम देशमुख गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर कारचालक आपली कार घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार, कारवरील अज्ञात चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक नरवाडे करत आहेत.