चाळीसगाव ( प्रतिनिधी )– शहरातील दयानंद पुलावर दुचाकीवरून आलेल्या भामट्याने विवाहितेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे सोने हिसकावून धुम ठोकल्याची घटना घडली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहरातील मोरया नगर येथे विश्वास धर्मराज चौधरी परिवारासह वास्तव्यास व मेहूणबारे आश्रम शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी कल्याणी चौधरी (वय-३०) रविवारी सायंकाळी दयानंद पुलावरून जात असताना समोरून दोन इसम दुचाकीवरून जवळ आले. त्यामधील मागे बसलेला राखाडी रंगाचा शर्ट घातलेला इसमाने कल्याणी यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे मिनिगंठन हिसकावून नेले. महिलेने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु भामट्यांनी धुम ठोकली. चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात कल्याणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.