मुक्ताईनगर पुलाजवळची घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष रामराव घोडकी (वय ४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (वय ३४, दोन्ही रा. निमखेडी खुर्द ता. मुक्ताईनगर) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. दोघे पतीपत्नी हे मध्यप्रदेशातील फोपनार येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते. आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएफ ९२११) ने निघाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील हनुमान मंदीरासमोरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दाम्पत्य ठार झाले. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मयताचा पुतण्या प्रविण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.